यवतमाळ - अडचणीत सापडलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी १५ जूनपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या याद्या, तसेच सातबारा व ८ अ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकऱ्यांना मागेल त्याला पीक कर्ज, तालुकास्तरावर कर्ज मेळावे घ्यावे, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्हाधिकारी व बँकांच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ ३० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, असे आदेश किशोर तिवारी यांनी दिले आहे. शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी १५ जूनपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला कर्जपुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी, कुचराई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर बँकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, असेही यावेळी किशोर तिवारी यांनी सांगितले.
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्यानंतर पूर्ण कर्ज मिळेल, याची हमी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच बँकांनी मागेल त्याला पीककर्ज यानुसार जास्तीत जास्त शेतकरी खातेदारांपर्यंत पोहचवून कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असले तरी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पुनर्गठन झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून देण्यात बँका कुचराई करतात. ही बाब चिंतेची आहे. १४ जिल्ह्यातील खरीप हंगामासंदर्भातील पीककर्जाबाबत केलेल्या नियोजनाची माहितीचा अहवाल देण्याचे आदेश किशोर तिवारी यांनी दिले.