यवतमाळ - देशातील असंख्य उद्योगपती, व्यापारी, राजकीय पुढारी कर्जात आकंठ बुडाले असूनही कधीच मृत्यूला कवटाळत नाही. उलट देश सोडून पळून जातात. मग तुम्ही कास्तकार या देशाचा कणा असूनही आत्महत्या कशी करतात? अरे, ताठ मानेने कोणतेही काबाड-कष्ट करा, लाजू नका अन् सर्व कुटुंबाला उध्वस्त करू नका, असे भावनात्मक आव्हान प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी यवतमाळ येथे आयोजित किर्तनात केले.
दिग्रस येथील कै. चंद्रशेखर पाटील जिनिंगच्या भव्य पटांगणावर पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ संजय देशमुख मित्र मंडळ व ईश्वर फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
कधी हसून-हसवून, थोडं धीर-गंभीर होवून, तर कधी चक्क रडवून आपल्या परिचित व विशिष्ट शैलीद्वारे इंदूरीकर महराजांनी थेट मनाला भिडणारे व ज्वलंत विषय मांडून उपस्थितांचे प्रबोधन केले. तरुणी व शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल व दुचाकींचा अतिरेकी वापर, व्यसनाधीनता, लग्नात पैशांची उधळपट्टी, अंधश्रद्धा, जातीयवाद, वृद्ध व महिलांचा अनादर व दैनंदिनाशी निगडित इतर असंख्य विषयाच्या चौफेर फेरी झाडत प्रचंड दाद मिळविली. दारुच्या एका बाटली खातर किंवा इतर आमिषाला बळी न पडता १०० टक्के मतदान करून योग्य उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामाच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिग्रस शहरासह तालुक्यातील महिला, तरुण मंडळी तथा सर्व भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध आयोजन ईश्वर फाऊंडेशन व संजय देशमुख मित्र मंडळातर्फे करण्यात आले होते.