यवतमाळ - संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आणखी कडक निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध उद्या सकाळी 7 वाजेपासून 15 मे च्या सकाळी 7 पर्यंत राहणार आहेत. त्यामुळे, त्याचे पडसाद आज बाजारात दिसून आले. बेफिकरी पणाचा कळस गाठत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा आणि भाजी बाजारात मोठी गर्दी केली.
हेही वाचा - यंत्र एक, कामे पाच; आर्णी तालुक्यातील शेतकऱ्याचा अनोखा अविष्कार
घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दिले आहेत. दरम्यान काल या आदेशात नव्याने बदल करण्यात आला असून लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात आले. 15 मे ला सकाळी 7 पर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. नव्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्याधिकारी अमोल येडगे यांनी यासंबधी रात्री उशीरा आदेश जारी केले असून आज सकाळपासून याचे पडसाद बाजार पेठेत उमटताना दिसून आले.
वर्दळीमुळे वाहतुकीची कोंडी
लॉकडाऊनची धाक भरलेल्या नागरिकांनी सकाळपासून बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील इंदिरा गांधी मार्केट, मारवाडी चौक, धान्य मार्केट, नेताजी चौक, दत्त चौक, एसबीआय चौक, आठवडी बाजार परिसर, जाजू चौक, आर्णी रोड आदी अनेक ठिकाणी वर्दळीमुळे वाहतुकीची कोंडी झाली.
हेही वाचा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी