यवतमाळ - जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या रोजच्या होण्याऱ्या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. सर्व शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागले आहेत. जिल्ह्यात कपाशीनंतर सर्वाधिक सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही शेतकर्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जात आहे. बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या भावात विक्री होत असल्याचे, चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
'गतवर्षी बसला बोगस बियाण्यांचा फटका'
शेतकर्यांचे वर्षभराचे गणित खरीप हंगामावर अवलंबून असते. मागील काही वर्षांपासून शेतकरी सतत नापिकीचा सामना करीत आहे. तरीही एक हंगाम आपल्याला साथ देईल, या अपेक्षेने बळीराजा शेतात राबत आहे. गेल्यावर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. बोगस बियाण्याचा फटका शेतकर्यांना तोट्यात ठकलणारा ठरला आहे. या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला होता. काही ठिकाणी बोगस बियाणे, खतांच्या साठेबाजीवर धाडसत्रही राबविण्यात आले. मात्र, बोगस बियाणे विक्रेत्यांना पकडण्यात कृषी विभागाला काही यश आले नाही. पेरणीच्या तोंडावर शेतकर्यांच्या माथी बोगस सोयाबीन बियाणे आणि तेही चढ्या भावात देण्यात येत आहे. अशीच परस्थिती राहिल्यास शेतकर्यांनी कुणाकडून अपेक्षा धरायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.