यवतमाळ - काल (शुक्रवारी) सकाळपासून ढगाळी वातावरणाचे पावसात रूपांतर झाले. जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाल्याने यवतमाळ तहसील कार्यालयात काही खोल्यामध्ये पाणी साचले. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काल (शुक्रवारी) धुव्वाधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. विजांचा कडकडाट होत पाऊस बरसला. पावसाचा जोर अधिक असल्याने कामावर जाणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला दुकानात आडोसा शोधावा लागला. रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर तहसीलदारांच्या कक्षात देखील पाणी शिरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाण्यात खुर्ची टाकूनच काम करावे लागले. आठ दिवस पावसाने उसंत दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी आणि डवरणी केली. त्यामुळे आलेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी लाभदायकच ठरला.