यवतमाळ- निसर्ग केव्हा कुठला चमत्कार दाखवेल याचा काही नेम नाही. अर्थात, या चमत्कारामागे वैज्ञानिक कारणही असतात. उन्हाच्या तीव्रतेने भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. एकीकडे हातपंपाना पिण्यापुरतेही पाणी येत नसतांना बिजोरा येथे एका बोअरवेलमधून चक्क गरम पाणी येऊ लागल्याने शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी बिजोरा येथे बघ्यांची गर्दी उसळली आहे.
महागाव ते उमरखेड मार्गावरील बिजोरा येथे राष्ट्रीय मार्गाला लागूनच प्रभाकर मारोतराव राजने यांची शेती आहे. शेतामध्ये त्यांनी व्यवसाय म्हणून 'जय अंबे ढाबा' सुरू केला आहे. बाजुलाच पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांनी पाण्यासाठी बोअरवेल खोदली होती. त्याच बोरवेलचे पाणी ढाब्यावर वापरले जाते. मात्र, आज येथे वेगळाच प्रकार घडला. सबमर्सिबल मोटर पंपाचे बटन दाबताच बोअरवेल मधून चक्क उकळते पाणी बाहेर येऊ लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. बराच वेळ मोटर पंप चालू ठेवला तरी सातत्याने उकळते पाणी बाहेर येऊ लागले. थोड्याच वेळात या घटनेची चर्चा पंचक्रोशीत पसरली.
त्यानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. सुरुवातीला अगदी उकळते पाणी बोअरवेल मधून बाहेर येत असल्याने पीव्हीसी पाईपही उष्णतेमुळे गरम झाले. ५ वर्षापासून या बोरवेल मधून सामान्यपणे थंड पाणी येत असताना आज अचानक गरम पाणी बाहेर आल्यामुळे सर्वजण चक्रावून गेले आहेत. २१ जूनच्या रात्री परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. यात भूगर्भात काही भौगोलिक बदल होऊन बोरवेल मधून उष्ण पाणी बाहेर येत आहे काय? अशी चर्चाही यानिमित्ताने होऊ लागली आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन बोरवेल मधून गरम पाणी येण्यामागील वैज्ञानिक तथ्य काय आहे, याचा खुलासा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.