यवतमाळ - महागाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान काही ठिकाणी गारपीटही झाली. या गारपीटमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ-मोठ्या गारांमुळे हरभरा, तूर, कपाशी आणि हळद ही पिके जमिनीला टेकली आहेत.
या गारपीटीचा तडाखा महागाव तालुक्यातील हिवरा, फुलसावंगी, काळी (दौलतखान) या गावांना बसला. काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. शासनाने या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा - नागपुरात अवकाळी पावसासह गारपीट, फळबागांचे नुकसान
गारपीट आणि वादळी पावसामुळे तालुक्यात जीवितहानी झालेली नाही. मात्र, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाठी दोन दिवसात नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून अहवाल देतील, अशी माहिती महागाव तालुक्याचे तहसीलदार निलेश मडके यांनी दिली.