यवतमाळ - जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 98पर्यंत पोहोचला होता. मात्र जिल्हा प्रशासनाच्या अनेक उपाययोजना व नागरिकांच्या संयमामुळे तसेच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातवर आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या जवळपास 100 पर्यंत जाऊनही कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही, ही जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची मोठी कामगिरी आहे. तरीसुद्धा जनतेने घरीच सुरक्षित राहावे. कुठेही गर्दी न करता शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
गत दोन महिन्यांपासून सर्वांनी अतिशय चांगली मेहनत घेतली आहे. यात नागरिकांचेही सहकार्य मिळाले आहे. मात्र अजूनही लढाई संपली नाही. कोरोनावर सध्यातरी लस उपलब्ध नाही. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण गर्दी करू नये, मास्क लावूनच बाहेर पडावे. हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी दैनंदिन जीवनात उपयोगात आणाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.