यवतमाळ - वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली. मात्र, ते जिल्ह्यात अपवादाने येतात. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्याचे पालक म्हणून शेतकऱ्यांना संदिपान भुमरे यांच्याकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र, पालकमंत्री क्वचितच डोळ्याने दिसत असल्याने पालकमंत्री संदिपान भूमरे यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री आल्यास त्यांचे जोरदार स्वागत करु, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
समस्याचे निवेदन द्यायचे कुणाला? -
यवतमाळात पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालयदेखील नाही. शेतकऱ्यांनी समस्यांचे निवेदन द्यायचे कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून दिल्यास शेतकरी त्यांचे स्वागत करतील, असे मत शेतकरी नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केले. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त आहे. शेतकरी अनेक संकटात सापडले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, व्यापारी फसवणूक करीत आहेत. पिकविम्याचा लाभ मिळत नाही. पालकच नसल्याने न्याय कुणाकडे मागावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयाकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी जिल्ह्याला पालकमंत्री द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - भाजपा हा महान पक्ष आहे, ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात - संजय राऊत