यवतमाळ- कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जग हादरून गेले आहे. याचा फटका नेर तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात कर्फ्यू लागल्याने बाजार समित्या बंद आहे. त्यातच शेत मालाला उठाव नसल्याचे कारण सांगत व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील फळपीक उत्पादकांवर संकट कोसळले असून त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी होत आहे.
पारंपरिक पीक सोडून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळ शेतीचा निर्णय घेत टरबूज पिकांची मोठ्याप्रमाणात लागवड केली होती. त्यातून चार पैसे हातात येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात संचार बंदी केली असून अत्यावश्यक दुकाने सोडून बाकी सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, फळपीक उत्पादकांनी मेहनत करून उगवलेले पीक विकणे कठीन झाले आहे. जिल्ह्यातील बाजार समिती बंद आहे. उत्पादकांच्या मालाला उठाव नाही म्हणून व्यापारी माल घेण्यास नकार देत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता उत्पादित मालाचे करायचे काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ऊभा ठाकला आहे. या कठीन परिस्थितीत शासनाने काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
.....अशी आहे फळपिकांची अवस्था
जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पिंपरी गावचे मिथून मोंढे या शेतकऱ्याने ४ एकर शेतावर लाखो रुपये खर्च करून टरबूज पिकाची लागवड केली. ३ महिन्याआधी लागवड केलेले टरबूज आता काढणीला आले आहे. येत्या दोन दिवसात पीक तोडले नाही तर ते शेतातच खराब होऊन त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आडगाव येथील शेतकरी सतीश चवात आणि इतर २५ शेतकऱ्यांनी देखील टरबूज पिकाची लागवड केली. पूर्वी टरबूजचे व्यापारी १० रुपये किलो दराने टरबूज विकत घेत होते. आता टरबूजला २ ते ३ रूपये किलो भाव मिळत आहे. अशा वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा- लॉकडाऊन इफेक्ट : महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर वाहनांच्या रांगा