ठाणे - पैसे चोरल्याचा राग मनात ठेवून मित्रानेच मित्राची निर्घुण हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दिवा-पनवेल रेल्वे लाईनजवळील झुडपात टाकला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. या हत्येचा तपास कल्याण क्राईम ब्रँचने शिताफीने लावून मारेकरी मित्राला चार दिवसात गजाआड केले आहे. सौदागर तांडी (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लुचन लिंगा सुना असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे.
मारेकरी सौदागर आणि मृतक लुचन हे दोघे चांगले मित्र होते. दोघेही ओरिसा राज्यातील राहणारे होते. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नवीन इमारतीच्या बांधकाम ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होते आणि सोबतच राहत होते. लुचनने सौदागरचे दोन वेळा पैसे चोरले होते. याचा राग मनात धरून दारू पिऊन सौदागरने चार दिवसापूर्वी लुचनची तोंड दाबून आणि गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सौदागरने लुचनचा मृतदेह मानपाडा येथील नांदिवली परिसरातील दिवा-पनवेल रेल्वे लाईनजवळील झुडपात टाकला होता.
मानपाडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यावेळी मृतदेहाच्या हातावर `लुचन' असे शब्द गोंदविलेले होते. याच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकने कसोशिनी तपास करून मारेकऱ्याच्या मुसक्या आवळून मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. अतिशय किचकट असलेल्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केला होता.