यवतमाळ - दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन हे ठरवून देशविरोधी कारवाई करण्याकरिता केलेले आहे. यात भोळ्या शेतकऱ्यांना पाठीशी घातले आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वेगळं काही साद्य करण्यासाठी हे आंदोलन असून, हे देशाच्या विरोधात जाणार आहे. त्यांच्याच चुकीमुळे हे आंदोलन संपेल आणि देशाची जनता अशा आंदोलनंकर्त्यांना समर्थन देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे संपतील. कारण पंतप्रधानांनी देशाची सेवा केली आहे. जनता अशांना माफ करणार नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ते आज यवतमाळ येथे बोलत होते.
राष्ट्रीय सणाचा दिवस आंदोलनाचा होऊच शकत नाही
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन दिवस राष्ट्रीय सण आहेत. या दिवशी कुठलेच आंदोलन होऊ शकत नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या आंदोलनांना कुणी समर्थन करू शकत नाही. मात्र, दुदैवाने सरकारविरोधी पक्षाची जी मंडळी आहे त्यांच्याकडून एकही शब्द निघत नाही. जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पूजा करतात, त्यांच्या नावावर मते मागणारी मंडळी मूग गिळून बसलेली आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
विरोधी पक्षाकडून हिंसेला समर्थन
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे विरोधी पक्ष हिंसेला समर्थन देत आहेत. कुणीही बोलायला तयार नाही. याचाच अर्थ देशात नक्षलवाद, खलीस्थानची मागणी करणारा वर्ग पाकिस्तानकडून पोसला गेलेला आतंकवाद यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना चुकीचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वेगळ साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने एसआयटी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी सत्य बाहेर येईल त्यावेळी विरोधी पक्ष खरे देशभक्त आहे की आतंकवाद्याच्या मागे लागले आहे हे सर्वांना माहिती पडेल.