यवतमाळ - मागील पंधरा दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. राठोड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थक आणखी जल्लोषात आले. दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना दिग्रस, दारव्हा मतदारसंघात ताफा थांबवून वनमंत्री राठोड यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
वनमंत्री संजय राठोड यांचा दारव्हा-दिग्रस मतदारसंघातील हे देवस्थान असून मुंगसाजी माऊली यांचा भक्त संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात आहे. धामणगाव देव येथे मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेऊन त्यांनी आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. वनमंत्री राठोड हे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात मुंगसाजी माऊलींच्या दर्शनाने करतात, हे उल्लेखनीय आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात घाणेरडे राजकारण झाले - संजय राठोड
वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्यूवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले.
हेही वाचा- औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना; ट्विट करून दिली माहिती