यवतमाळ - आर्णी तालुक्यातील लोणी शिवखर येथे पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान वाहनातून अवैध गुटख्याची तस्करी करताना पाच जणांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून 13 लाख 23 हजाराचा गुटखा व सुगंधीत पान मसाला असा साठा आणि एक वाहन असा एकूण 18 लाख 23 हजारांचा मुद्धेमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई आर्णी पोलिसांनी केली.
नाकाबंदीदरम्यान केली कारवाई
आर्णी तालुक्यातील जवळावरून लोणीकडे एका वाहनातून गुटखा नेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान टाटा 909 आयशर (एमएच 29 टी 3355) वाहनांची तपासणी केली असता सुगंधी तंबाखू आणि पान मसाला साठा आरोपींना वाहनात आढळून आला. या वाहनात विमल पान मसाल्याचे एकूण 25 पोते ज्यात 5500 पाकीट एकूण 10 लाख 89 हजार तसेच सुगंधीत तंबाखूचे 2 पोते ज्यात 2200 पाकिटे असा एकूण ४ लाख ८ हजार 400 रुपये तसेच आर. के. क्लासिक सुगंधित तंबाखू असे एकूण पाच पोते ज्यात 5800 पाकिटे असा सर्व साठा एकूण किंमत 13 लाख 23 हजाराचा गुटखा व सुगंधीत पान मसाला राज्यात विक्रीसाठी साठवणूक वितरण उत्पादन करण्यास प्रतिबंध असलेला साठा आढळून आल्याने जप्त करण्यात आला.
पाच आरोपींना केली अटक
या कारवाईत अब्रार खान मुहम्मद खान (32, रा. दाफिन पुरा, कारंजा, जि. वाशिम), सोयब लाला (रा. फुलसावंगी, ता. महागाव), श्रीपाल बोरा ऊर्फ गोटूशेट (रा. आर्णी), फिरोज तगाले (रा. आर्णी), फिरोज (रा. कारंजा, जि. वाशिम) यांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई आर्णी पोलिसांनी केली.