यवतमाळ - येथील नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामासाठी जिल्ह्यातील अंबोडा येथील शेतकऱ्यांना अजून त्यांचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अंबोडा येथील उड्डाणपुलावर जाऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडले.
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी चौपदरीकरणामध्ये अंबोडा येथील येणाऱ्या जमिनीचे, गावातील घरांचे, खुल्या जागेचे शासनाने अधिग्रहण केले. यावेळी त्या जागेच्या मालकांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चौपदरीकरणाच्या मार्गाचे काम सुरू होऊन जवळपास १ वर्ष उलटून गेले तरी या पीडित शेतकरी व गावकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. आपल्या जमिनीचा, घराचा आणि प्लॉटचा मोबदला मिळावा या मागण्याकरिता अनेक वेळा शासन दरबारी निवेदने देण्यात आली. मात्र, नेहमीप्रमाणे येथील पीडित शेतकरी आणि गावकऱ्यांची शासन दरबारी अवहेलनाच झाली. तसेच जमीन अधिग्रहण केल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी पेरता आल्या नाहीत. अधीग्रहणात गेलेल्या जमिनीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे एका वर्षाचे पीक हातातून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे.
हेही वाचा - दिल्ली अग्नितांडव: २८ मृतांची ओळख पटली, इमारतीचा मालक, मॅनेजरही अटकेत
म्हणून सर्व 70 महिला पुरुषांनी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करण्यात आले. आंदोलकांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे पांडे आणि पवार यांना आमच्या जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काम चालू देणार नाही, असे ठामपणे सांगितले. यानंतर उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार नामदेवराव ईसाळकर घटनास्थळी पोहोचले. ज्यांना मोबदला मिळाला नसेल त्यांच्यामध्ये दिलीप बिल्डकॉन कंपनी दोघांचा समन्वय साधला जाईल. तसेच लवकरच त्यांना मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसिलदार ईसाळकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांच्या विहिरी, आंब्याची झाडे, सिंचनाकरिता शेतात मारलेले बोर, गावातील कच्ची पक्की घरे अधिग्रहित करून त्यांना वेगळा मोबदला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पीडित गावकरी आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. ज्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली आलेल्या बहुतांश लोकांना अतिशय कमी जागेत गुजराण करावी लागत आहे. तर काहींना येथील चंद्रमौळी झोपडीमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.