यवतमाळ - जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, तीन वर्षच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांकरता लागू करण्यात आली आहे. या योजनेची रब्बी हंगामाकरता 15 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करणे तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जनजागृती करणाऱ्या वाहनांना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या उपस्थित हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेडचे जिल्हा व्यवस्थापक अर्जुन राठोड, तंत्र अधिकारी शिवा जावध आदी उपस्थित होते. फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील 16 तालुक्यात जनजागृती करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना 15 डिसेंबरपूर्वी गहू, हरभरा पिकाकरता असून 31 मार्च हा भुईमुग पिकासाठी अंतिम राहणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. गहु व हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर प्रत्येकी 35 हजार रुपये असून शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा हप्ता प्रति हेक्टरी प्रत्येकी 525 रूपये आहे.