यवतमाळ - कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजूर यांनी नेहमी काळजी घ्यावी, असे कृषी विभागाकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र, अनेक शेतकरी, शेतमजूर फवारणी करताना सुरक्षा साहित्य वापरात नसल्यामुळे त्यांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचा धोका निर्माण होतो. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरीही फवारणी करताना सुरक्षा साहित्य वापरत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये २ वर्षांपूर्वी कीटकनाशक फवारणीतून २२ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला होता. त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन याच्यासंदर्भात तातडीने पावले उचलली होती. त्यामुळे २०१८ साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकरी-शेतमजुरांचा फवारणी करतांना विषबाधा होऊन मृत्यू झाला नाही.
मात्र, यंदा जिल्ह्यामध्ये ९ लाख हेक्टरवर खरीप नियोजन आहे. त्यात ५ लाख हेक्टरवर कापूस आणि २ लाख हेक्टरवर सोयाबीन आणि दीड लाख हेक्टरवर तूर लागवड केली आहे. शिवाय इतर पिकेसुद्धा लागवड करण्यात आली आहेत. आता पीक वर आल्यावर शेतात तणसुध्दा वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कपाशीच्या पिकांमधील तण होऊ नये, या दृष्टीने कीटकनाशके फवारणी करत आहेत.
असे असताना फवारणी करताना शेतकरी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य वापरत नसल्याचे दिसून येत आहे. फवारणी करताना तोंडाला मास्क न लावणे, शरीरावर पूर्ण कपडे न घालणे, जोडे न घालणे, वाऱ्याची दिशा ओळखून फवारणी न करणे अशा अनेक गोष्टींकडे शेतकरी आणि शेतमजूर दुर्लक्ष करतात. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पूरड या गावांमध्ये अशाच पद्धतीने अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये फवारणी करत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या संदर्भात शेतकर्यांना फवारणी किट वापरून फवारणी करावी याबाबत माहिती आहे. मात्र, काही होत नाही असे उत्तर काही शेतकऱ्यांनी दिले. त्यामुळे याकडे असे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर वेळेत काळजी घेणे हेच यावर उपाय ठरू शकते. त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकरी आणि शेतमजूर यांनी कीटकनाशके फवारणी करताना काळजी घेऊन फवारणी करावी. जेणकरून विषबाधा होणार नाही.