यवतमाळ - परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कापसाची बोंडं काळी पडली तर सोयाबीनच्या शेंगा सडल्या आहेत. परिणामी यावर्षी घरात काहीच उत्पन्न येणार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट 40 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
आर्णी तालुक्यातील लोणी, जवळा व लगतच्या परिसरातील परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद मूग या पिकांना जोरदार फटका बसला आहे. कपाशीचे बोंडं काळी पडली असून रोपावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. ज्या भागात सात ते आठ क्विंटल कापूस निघायचा, त्याठिकाणी आता एक ते दोन क्विंटल कापूस निघण्याचीही शक्यता नाही.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टीची खरी परिस्थिती माहिती नाही - देवेंद्र फडणवीस
सोयाबीन पिके तर जागेवरच सडत असून शेंगांना कोंब फुटले आहेत. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आला. मात्र, उत्पन्न तीन ते चार हजार येणार आहे. असे असताना सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन कधीही पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व व्यथा घेऊन शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. पंचनामा न करता थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याकडे केली. त्यानंतर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग यानी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि सोयाबीन व कापसाची पाहणी केली.
हेही वाचा-शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करा - खासदार नवनीत राणा