यवतमाळ - जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात शेतकरी फवारणी करीत आहेत. त्यात कपाशीची उंची वाढली असून अनेक ठिकाणी शेतमजूर काळजी न घेता कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याने त्याना विषबाधा होत आहे. बरेचदा कुठलेही सुरक्षा साधन किट न वापरता फवारणी केली जाते. त्यामुळे विषबाधा होवून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
राळेगाव तालुक्यातील चिखली गावातील सुरेश कोडापे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. 8 दिवसांपूर्वी त्यांच्या शेतातील कपाशीवर ते कीटकनाशकची फवारणी करीत होते. मात्र, फवारणी करताना किटनाशक त्यांच्या अंगावर उडाले आणि त्यांना विषबाधा झाली. घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना राळेगाव आणि नंतर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कृषी विभाग शेतकऱ्यांना फवारणी करताना कुठली काळजी घ्यावी, असे फक्त कागदोपत्री सांगते. मात्र, प्रत्यक्षात या संदर्भात कोणत्याही प्रकारची जनजागृती होताना दिसत नाही. यामुळेच विषबाधा होण्याचे प्रकार वाढत आहेत. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकार परिसरात विषबाधा होऊन 23 शेतकरी आणि मजुरांचा मृत्यू झाला होता.