यवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गाने यवतमाळ शहरात विळखा घातल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेकडो नागरिकांना त्यांच्या घरातून ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात दाखल केले. याठिकाणी दाखल नागरिकांना निकृष्ट भोजन मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय आयसोलेशन आणि विलगीकरण कक्षात प्रचंड घाणीचे साम्राज्य असून अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नागरिकांच्या समस्या मांडल्या असता त्यावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्रभारी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक निरुत्तर झाले.
आयसोलेशन वार्डातील उपचारार्थ दाखल रुग्णांची व्यवस्था ही अधिष्ठातांकडे तर विलगीकरण कक्षातील नागरिकांची व्यवस्था ही जिल्हा शल्यचिकित्सकांकडे असल्याने नागरिकांच्या तक्रारीबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधितांनीच उत्तर द्यावे, असे पालकमंत्र्यांनी सूचना दिली. मात्र उपस्थित तिन्ही वरिष्ठ अधिकारी निरुत्तर झाल्याचे बघायला मिळाले. दिल्या जाणाऱ्या भोजनात सोंडे आढळत आहे, दर्जा निकृष्ट आहे, वेळेवर भोजन मिळत नाही. याशिवाय पाण्याच्या कॅनची सुविधा नाही, कक्षात एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी आहे, ऍप्रॉन, हँडग्लोव्ह्स, यांसह वैद्यकीय कचरा आणि घाण कक्षात आहे, कक्षात निर्जंतुकीकरण होत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी यावेळी उपस्थित झाल्या.
अधिष्ठाता डॉ. आर पी सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांना समाधानकारक उत्तरं देता न आल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांना कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा स्पष्ट शब्दात खडसावले. नागरिकांच्या या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत. आयसोलेशन वार्ड व विलगीकरण कक्षात नागरिक आरोग्याच्या काळजीने येतात. मात्र याठिकाणी त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याच्या तक्रारी असेल, तर आपली जबाबदारी ओळखून काम करावे लागेल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तर यापुढे संबंधित तक्रारींबाबत देखरेखीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
दरम्यान नागरिकांच्या तक्रारीबाबत बोलताना अधिष्ठाता यांनी नागरिकच कचरा आणून टाकतात व फोटो व्हायरल करतात, असे बिनबुडाचे उत्तर दिले. तर आंम्ही स्वतः वार्डात निर्जंतुकीकरण करीत असतो, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. शिवाय सफाई कामगार वार्डात जात नसल्याची कबुली देखील त्यांनी देऊन वार्डात अस्वच्छता राहत असल्याचे अप्रत्यक्ष मान्य केले.