यवतमाळ - जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे चार दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी यांनी संप पुकारून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. अखेर पालकमंत्री संजय राठोड यांच्या मध्यस्तीने जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातील वाद मिटवण्यात यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोलमडलेली कोविड यंत्रणा पुन्हा सुरळीत होणार आहे.
जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांनी 28 सप्टेंबर पासून कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आता या वादावर पडदा पडला आहे. वैद्यकीय अधिकारी शनिवारपासून रुजू होणार आहे. त्यामुळे कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुरळीत होणार आहे. आंदोलनस्थळी पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट दिली. आणि सर्व वैद्यकीय अधिकारी यांना त्यांच्या मागण्या संदर्भात आश्वासित केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय अकोलकर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्या वर्तणुकीत असंविधानिक भाषेचा वापर झाल्यास त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, आरोग्य विभागातील सर्व स्तरावरील आढावा, सभा, अहवाल आणि कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यावर सोपविण्यात आली. आंदोलनामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येणार नसल्याची ग्वाही देण्यात आली. तसेच कोविडचा अहवाल ग्रामीण भागातून मागविण्याबाबत शासनाकडून निश्चित वेळ मर्यादा ठरवून देण्यात येणार आहेत, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या कुटुंबाकरिता 50 बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एक औषधी दुकान, सिटी स्कॅन सेंटर हे आरोग्य अधिकारी कर्मचारी व नर्सेस यांची तपासणी साठी राहणार असून हा सर्व खर्च जिल्हास्तरीय अंतर्गत निधीमधून करण्यात येणार आहेत. या मागण्याही शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय अधिकारी संघटनेला लेखी पत्र दिले.