यवतमाळ - शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदीबाबत गत आठवड्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी. सिंहदेखील उपस्थित होते. बैठकीत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस महासंघ (कॉटन फेडरेशन) यांना कापूस खरेदीबाबत अंतिम नियोजनसुध्दा आखून देण्यात आले होते. त्यानुसार रोज किमान किती गाड्या कोणत्या जिनिंगवर जातील, आदी सुचना देण्यात आल्या. तरीसुध्दा दारव्हा येथील जाधव जिनिंगमध्ये कापूस खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहे.
दारव्हा येथील जाधव जिनिंगला जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन कापूस खरेदीबाबत आढावा घेतला. या जिनिंगमध्ये रोज किमान 50 गाड्या घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, या जिनिंगमध्ये अतिशय कमी गाड्या घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदी करण्यात दिरंगाई करण्यात आली आहे. जाधव जिनिंगमध्ये 15 जून रोजी 24 गाड्या, 16 जून रोजी 17 गाड्या, 17 जून रोजी एकही गाडी नाही.
शिवाय जिनिंगमध्ये कापूस खरेदी बंद आणि 18 जून रोजी केवळ 10 गाड्या कापूस खरेदी करण्यात आली. त्यामुळे दारव्हा येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी घेतली. ठरवून दिलेल्या किमान गाड्यानुसार कापूस खरेदी झाली नाही तर यापुढे कडक पाऊले उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
हेही वाचा - उन्हाळी धान पावसाने शेततातच भिजले, शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्हा उपनिबंधक, सीसीआय आणि कॉटन फेडरेशन यांनी समन्वय साधून कोणत्याही परिस्थतीत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी करावा. नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी येथील जिनिंगमध्ये सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यात येईल. 8987 शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय तर उर्वरीत 8414 शेतकऱ्यांचा कापूस फेडरेशनने खरेदी करण्याबाबत नियोजन आखून देण्यात आले होते.