यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील खुनी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या कालिदास बळीराम ठाकरे यांचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. जिल्हा शोध व बचाव पथकाच्या सदस्यांना ठाकरे यांचा मृतदेह तब्बल 40 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर मिळाला. जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील कावठा येथील कालिदास बळीराम ठाकरे (41) हे सायंकाळी 5.30 च्यासुमारास गावाशेजारील खुनी नदीच्या पुलावर फिरायला गेले. पुलावरून फिरत असतांना त्यांना अचानक भुरळ आली. यात त्यांचा तोल जाऊन ते खुनी नदीच्या पात्रात पडले व वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे हे घटनास्थळी गेले. कालिदास ठाकरे यांचा स्थानिक भोई यांच्यामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. अखेरीस त्यांनी जिल्हा कार्यालयास शोध व बचाव पथकाची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्य आदेशान्वये जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख प्रशांत कमलाकर व किशोर भगत यांच्या नेतृत्वात 13 पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले व शोध कार्याला सुरूवात केली.
दोन दिवसांपासून पांढरकवडा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. खुनी नदीपात्रात पाणीसाठा अधिक असल्यामुळे जिल्हा शोध व बचाव पथकास मृतदेह शोधतांना अडथळा येत होता. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना 40 तासांच्या अथक परिश्रमानंतर कालिदास ठाकरे यांचा मृतदेह शोधून काढण्यास यश आले.