यवतमाळ - पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवा. यातून शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला केले आहे. कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी, राज्यात 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान, कृषी संजीवनी सप्ताह राबवला जात आहे. त्या अनुषंगाने मारेगाव तालुक्यातील हटवांजरी आणि खैरंगाव येथील शेतकरी प्रमोद नेवारे यांच्या शेतावर शेतक-यांशी संवाद साधताना कृषीमंत्री दादाजी भुसे बोलत होते.
कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी शेतक-यांना त्यांच्या बांधापर्यंत जावून मार्गदर्शन करावे, येणाऱ्या दिवसात शेतीतील शारिरिक कष्टाची कामे तांत्रिक पद्धतीने कसे करावे, याविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच फवारणी यंत्र कोणते वापरावे, त्याचे नोझल कोणते वापरावे, रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, विषबाधांच्या दुर्घटना कशा थांबवता येईल, या सर्व बाबींचेसुध्दा प्रशिक्षण शेतक-यांना दिले जाईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.
बियाणे उगवण शक्तीचा प्रयोग केला होता का, तो कसा केला, तुम्ही केलेल्या प्रयोगातून नवीन काही शिकायला मिळाले का, इतरांनी काय सुधारणा कराव्या आदीची माहिती कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. शेती शाळा प्रशिक्षणामुळे जे शिकायला मिळाले, ती माहिती गावातील इतर महिलांनाही द्या. तसेच कृषी विभागातर्फे होणा-या मार्गदर्शानाचा तळागाळातील शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्यभरातील साडेतीन हजार प्रगतशील शेतकऱ्याच्या 'रिसोर्स बँक'चे उद्घाटन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांशी खरिप हंगाम, कर्जमाफी, खते, बनावट बियाणे आदी विषयावर चर्चा करून त्या सोडविण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. यावेळी वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक, शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक सुभाष नागरे उपस्थित होते.
हेही वाचा - यवतमाळमधील मांडवी परिसरात वाघाचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
हेही वाचा - मृत्यूनंतरचा प्रवासही खडतर; जिल्ह्यातील 464 गावांत स्मशानभूमीच नाही