यवतमाळ - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवार सायंकाळी 5पासून सोमवारी सकाळी 9पर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे.
अत्यावश्यक सुविधा राहणार सुरू
दुध व दुग्धजन्य पदार्थ हे जीवनाश्यक व अत्यावश्यक असल्यामुळे तसेच ते नाशवंत पदार्थ असल्याने (दुध विक्रेते, डेअरी) आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 9पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शनिवार सायंकाळी 5पासून सुरू झालेली संचारबंदी सोमवार सकाळी 9पर्यंत राहणार आहे. या संचारबंदीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने व त्यांच्या औषधी दुकानांसह), पेट्रोलपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
या कालावधीत आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.