यवतमाळ - सध्या चौफेर संकटात असलेल्या शेतकऱ्याला आता सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. बियाणे कंपन्यांनी बोगस सोयाबीनचा पुरवठा केल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांवर सोयाबीनच्या दुबार पेरणीची वेळ आली. याबाबत 549 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर या पिकाची लागवड करतात. मात्र, अलीकडे कापसाच्या पिकात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आता सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली. खरीप हंगामात जिल्ह्यात जवळपास साडेदहा लाख हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहून यावर्षी शेतकऱ्यांची सोयाबीनमध्ये अक्षरशः लूट झाली. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. यातून जे उत्पन्न मिळेल त्यावर वर्षभराचा खर्च केला जातो. मात्र, आता शेतात पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.
ज्या कृषी विक्रेत्याकडून बियाणे घेतले त्याच्याकडे तक्रार केली जात आहे. मात्र, मुजोर कृषी विक्रेत्याकडून शेतकऱ्याला घरी परतवून लावले जात आहे. बाभुळगाव येथील इंदरचंद तातेड या कृषी विक्रेत्याने शेतकऱ्याला कोहिनूर सोयाबीन बियाणे दिले. मात्र, हे सोयाबीन देत असताना बिल दिले नाही. यानंतर शेतकऱ्याने बिलाची मागणी केली तेव्हा सोयाबीनच्या बॅगवरील टॅग आणि बिलामध्ये खाडाखोड केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
आता शेतकऱ्यांकडे भांडवल नाही. अशा स्थितीत शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी सोयाबीनचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बियाणे खरेदी केले, मात्र ते उगवलेच नाही. याबद्दल कृषी विभागाकडे 549 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. आता कृषी विभाग चौकशी करून अप्रमाणित बियाणे विक्रेत्या कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.