यवतमाळ - दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, यावेळी प्रकृती एकदम खालावल्याने नातेवाइकांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. याठिकाणी डॉक्टरांना सांगितल्यानंतरही तब्बल दीड तास थांबल्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे या कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.
कागदपत्रे बनविण्यात सगळे गुंग -
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णाला आणल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत चालली असल्याची माहिती डॉक्टरांना देण्यात आली. मात्र, डॉक्टरांनी आमच्याकडे बेड नाही, जसे बेड उपलब्ध होईल, तसे भरती करू, असे सांगितले. तसेच ऑक्सिजनची उपलब्धता नाही, ऑक्सिजन आल्यावर लावू, असेही सांगण्यात आले. नंतर रुग्णालयातील कर्मचारी कागदपत्रे बनवण्यात वेळ घालवल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि ऑक्सिजन नसल्याने शेवटी रुग्णालयातच त्यांना जीव गमवावा लागला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.