यवतमाळ - जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा स्त्री रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सद्यस्थितीत 100 बेड -
पालकमंत्री संदिपान भुमरेंनी हॉस्पिटलमधील आकस्मिक विभाग, प्रयोगशाळा, स्वॅब टेस्टिंग केंद्र, फिवर क्लिनीक, नमुना संकलन कक्ष, रक्त तपासणी आदींची पाहणी केली. तसेच उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करा, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. येथील स्त्री रुग्णालयात एकूण 180 बेड नियोजन असून सद्यस्थितीत 100 बेड उपलब्ध आहेत. तर 80 बेड प्रस्तावित आहेत. यात ऑक्सिजन बेड 42 आणि नॉर्मल बेड 58 आहे. तसेच सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाइनचे 42 पॉईंट असून 10 लिटर प्रति मिनिट क्षमता असलेले पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. तसेच 20 किलो लीटर लिक्विड ऑक्सिजन टँक आणि प्रस्तावित 608 एलएमपी ऑक्सिजन प्लांट व प्रतिदिवस 135 जंबो सिलिंडरचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'म्यूकरमायकोसिस रूग्णांना दिलासा द्या'; सोनिया गांधींचे मोदींना पत्र
दरम्यान, यावेळी पालकमंत्र्यांसोबतच आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपजिल्हाधिकारी सविता चौधर आदी. उपस्थित होते.