यवतमाळ - पुसद नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र नगरपरिषदेने खरेदी केलेल्या साहित्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक साकिब शहा यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रातून तक्रार केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
महामारीच्या काळात नगरपरिषदेने अनेक सुरक्षा साहित्य खरेदी केले. संबंधित खरेदी अवास्तव भावाने करण्यात आल्याचा आरोप शहा यांनी केला. यात भाजी विक्रेत्यांसाठी उभारलेल्या कापडी मंडपाचा खर्च 8 लाख 83 हजार 350 रुपये दाखवण्यात आला आहे. तर बांबूंनी बंद करण्यात आलेल्या बॅरिकेटसाठी साठी 4 लाख 486 दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामाचे कंत्राट नगरपरिषदेतील कर्मचारी सय्यद वकार यांच्या मुलाच्या नावे आहे. तसेच 'थ्री-लेयर मास्क' च्या दर बाजारात 4 रुपये आहे. ते 20 रुपयाने खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 3.50 रुपयांचे मास्क 19 रुपये किंमतीने खरेदी केले आहे. नर्सला लागणाऱ्या अॅप्रनची किंमत 50 रुपये असून ते 120 रुपये प्रति नग याप्रमाणे खरेदी करण्यात आले आहे.
200 रुपये किंमतीचे सॅनिटायझर 500 रूपयाने खरेदी करण्यात आले आहे. इन्फ्रारेड थर्मामिटरची किंमत 2200 रुपये आहे. त्यांची खरेदी 7200 रुपये प्रमाणे करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक साकीब शहा यांनी केला आहे. यानंतर पालिका प्रशासनाने हे आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. सर्व खरेदी नियमांप्रमाणे झाल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. आता जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.