यवतमाळ- शहरातील गुलमोहर पार्क आणि मोमिनपुरा भागात तब्बल ८ कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास आहे. प्रशासनाने या भागांमधील ३ किलोमीटरपर्यंतचा परिसर पूर्णपणे बंद केला आहे. या भागांमध्ये 'डोअर टू डोअर' आरोग्य तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आणखी काही लोक आलेले असतील तर त्यांनी स्वत: हून यंत्रणेसमोर यावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून स्वत: च्या आणि इतरांच्याही आरोग्याच्या धोका निर्माण होणार नाही. तसेच, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रतिबंध करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.
शहरातील प्रतिबंध घालण्यात आलेल्या भागासाठी प्रत्येकी ३० आरोग्य कर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार करण्यात आले आहेत. या भागात ६ हजार ८२७ घरे असून ३३ हजार ०४५ एवढी लोकसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत ‘डोअर टू डोअर’ सर्व्हे करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. पुढील १४ दिवस या भागांमध्ये सर्व्हे सुरू राहणार आहे. तसेच, या भागात दररोज स्प्रे-पंपाद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
हेही वाचा- कोरोनाशी लढण्यासाठी चिमुकल्यांची मदत, वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द