नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी विधीमंडळ सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
अधिवेशन काळात विदर्भातील जिल्ह्यांच्या आढावा बैठकांचे नियोजन करण्यात येते. स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय होण्यासाठी राज्यातील इतरही भागात जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यात येतील. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हे वाचलं का? - बलात्कारी भाजप आमदाराला न्यायालय कठोर शिक्षा सुनावेल - नवाब मलिक
यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 102 कोटी रुपयांचे वाटप झाले. दुसऱ्या टप्प्यातील 222 कोटींची मदत वाटपाची कार्यवाही तालुका स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकासाचा निधी उपलब्ध करून देऊ, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्जा, ख्वाजा बेग, निलय नाईक, विधानसभेचे आमदार संजय राठोड, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे, डॉ. अशोक उईके, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, किशोर तिवारी आदी उपस्थित होते.