यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास आष्टोना येथे घडली. यामध्ये शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे.
आष्टोना येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठपर्यंत वर्ग आहे. जवळपास शंभर विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. यासाठी वेगवेगळ्या वर्गखोल्या आहेत. मागील ८ दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे या शाळेची जार्ण झालेली वर्गखोली अधिकच कमकुवत होऊन कोसळली. हा प्रकार रात्रीच्यावेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. शिक्षण विभागाने या शाळांकडे आतातरी लक्ष द्यावे, त्यांचे पुनर्बांधकाम करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.