यवतमाळ - जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या खरीप हंगामातील नगदी पिकांतून शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही निघाला नाही. पीक काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर निर्माण झाला. या दोन पिकातून झालेल्या नुकसानीचा भार कमी होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गहू, हरभरा या पिकाची लागवड केली. परंतु, आता हरभरा पिकावर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सहा-सात इंच वाढलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.
बुरशीनाशक ठरले कुचकामी -
कृषी विभागाच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी केली होती. पीकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात मुळांची कूज होऊन रोप मरत आहे. बुरशीनाशकाची फवारणी करूनही फायदा होताना दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या जागेवर हरबरा पेरणी केली त्या जमीवर हे प्रमाण जास्त दिसत आहे.
35 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत -
झरी तालुक्यातील अडकोली शिवारात बापूराव आवारी यांच्या दोन एकर हरभरा पीक 'मर' रोगाने पातळ झाले आहे. त्याचप्रमाणे मार्की (बु )येथील शेतकरी हरिदास भोंगळे यांच्या शेतातील चार एकर पीक पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया करूनही 'मर' रोगाचे नष्ट होत आहे. त्यामुळे आता कापूस, सोयाबीन प्रमाणे हरभरा पीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. यवतमाळ जिल्हातील 35 हजार हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाची हीच अवस्था आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन तोकडे असून ते प्रत्यक्ष कृतीत आणताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.