यवतमाळ - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकाडाऊन लावण्यात आला आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. अनेकांच्या घराचे, इमारतीचे काम चालू होते. मात्र, लाॅकडाऊनकाळात ते बंद पडले आहे. परिणामी वीटांची मागणी घटल्याने वीटभट्टीवरचे कामही बंद पडले आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना महामारीच्या काळात बांधकामाला ब्रेक बसला आहे. मागणीच नसल्याने वीटभट्टी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकाने कर्ज काढून वीटभट्टी व्यवसाय सुरू केला. परंतु, हातात दोन पैसे पडण्याऐवजी कोरोनामुळे व्यवसाय मंदीत आहे. शिवाय कामावर असलेल्या मजुरांनाही जगावावे लागत आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून वीटभट्टी काम बंद आहे. व्यवसाय चालला तरच, कशीबशी घराची चूल पेटते. मात्र, कोरोनामुळे चूल पेटणे मुश्किल झाले आहे. काम नसल्याने मजूरही गावाकडे परत जात आहेत. काही मजूर कामावर असले तरी, कुटुंबाला जगवावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.