यवतमाळ : केंद्र शासनाने नेहरू लियाकत करारानुसार पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दबाव निर्माण करावा, पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचे पाणी अडवावे तसेच अग्नी आकाश मिसाईल सोडून पाकिस्तानचे तुकडे पाडावे अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. यवतमाळमध्ये हिंदू धर्म रक्षा निधी संकलन तसेच संघटन बांधणीसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपवर तोगडियांची टिका : मी मरेपर्यंत हिंदूंच्या कल्याणासाठी काम करेल, हिंदू विरोधी भूमिका न घेणाऱ्या सर्व पक्षांसोबत काम करेल. मात्रस मस्जिदीत जाणार नाही, मुघलांच्या तलवारीसमोर घुटने टेकणार नाही. अशा शब्दात त्यांनी सरसंघचालकांना टोला लगावला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाना साधला.
केंद्र सरकारवर टीका : कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केल्याने केंद्र सरकारवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी, अमित शहा अयोध्येत कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोकजी सिंघल, बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील रामचंद्र परमहंस, कोठारी बंधू यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशीही मागणी डॉ. तोगडिया यांनी केली. ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत. त्या देशाचे कधीच कल्याण होत नसते, असे देखील ते म्हणाले.
हिंदू कुणाचा गुलाम नाही : सध्या राजनीतीचे हिंदुकरण झालेले आहे, त्यात आपला खारीचा वाटा आहे. म्हणून भाजप सोबतच अनेक पक्षांचे नेते हिंदू हिताच्या गोष्टी करताहेत. मात्र, हिंदू कुणाचा गुलाम आहे. या भ्रमात कुणी राहू नये असा टोला त्यांनी संघ भाजप नेतृत्वाला लगावला. काश्मीरमध्ये हिंदूंची अद्यापही सुरक्षा झाली नाही. यासाठी आजवरचे सर्व सरकार जबाबदार आहे. 370 कलम हटवूनही काश्मीरमध्ये हिंदू शरणार्थी असल्याची वेदना मनात असल्याचे डॉ. तोगडियांनी सांगितले.