यवतमाळ - राज्यामध्ये बोथबोडन या गावात सर्वाधिक 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबातील महिलांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला व भारत बंदला समर्थन दिले आहे. आंदोलनात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी गावात आज ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी कृषी कायद्याची होळी केली.
राज्य व केंद्र सरकारने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्या आहेत. मात्र, त्याचा कुठलाच फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे या गावात 29 शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे शेतकरी अनुप चव्हाण यांनी सांगितले. नुकतेच केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी पुन्हा देशोधडीला लागणार आहे. या काळ्या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. हा काळा कायदा रद्द करावा, अशी विधवा शेतकरी महिलांची व तरुण शेतकऱ्यांची मागणी आहे. पंजाब व हरियाणामधील १० लाखहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे.
हेही वाचा-कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा १३वा दिवस; आज भारत बंद! पाहा LIVE अपडेट्स..
दिल्लीत जाऊ शकत नाही मात्र येथून समर्थन
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शेतकरी या ठिकाणी जाऊन आंदोलन करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात असलेल्या या शेतकरी कुटुंबातील महिला दिल्लीमध्ये आंदोलनाला सहभागी होऊ शकत नाही. मात्र, त्यांनी गावातूनच आंदोलन करून कृषी कायद्याची होळी केली. जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही, तोपर्यंत या आंदोलनाला समर्थन राहणार असल्याचा निर्धार या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी केला आहे.
हेही वाचा-माझे नाव घेऊन शेतकरी आंदोलनाच्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न - शरद पवार
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज तेरावा दिवस आहे. शेतकरी संघटनांशी केंद्र सरकार कृषी कायद्याबाबत उद्या चर्चा करणार आहे. तत्पूर्वी शेतकरी संघटनांनी देशात आज 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.