यवतमाळ - कोणतीही उगवण क्षमता नसताना विक्रीसाठी आणून ठेवलेल्या बनावटी बोगस बियाण्यांच्या साठ्यांवर भरारी पथकाने पांढरकवडा येथे छापा मारला. या कारवाईत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर आला असून, त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे वाण विक्रीसाठी दाखल झालेले आहे. शेतामध्ये पेरण्यासाठी कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावे याच द्विधा मनस्थितीत शेतकरी दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पांढरकवडा तालुक्यांमध्ये बोगस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाली आहे. याची कुणकुण लागताच तालुकास्तरीय भरारी पथकाने एका पांढरकवडा येथे असलेल्या शेतात असलेल्या गोठ्यात छापा टाकला. यावेळी महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेले जादू नामक बनावट कंपनीचे पाकिटे आढळून आली. या छाप्यात बियाण्यांचे 172 पाकिटे जप्त करण्यात आली. या कारवाईत मोहन बासम याला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. ही कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.