यवतमाळ - पंधरा दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर धामणगाव देव येथेही दर्शन घेतले. तेथून राठोड ताफ्यासह यवतमाळ शहरात येत होते. दरम्यान, मृत पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात यवतमाळ एमआयडीसी बायपासवर पदाधिकार्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला.
त्यामुळे काही वेळेसाठी त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मृत पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहेत. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारो लोक संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. या सगळ्या प्रकरणाबाबत विरोधकांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात घाणेरडे राजकारण झाले - संजय राठोड
वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्युवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले.
कालपर्यंत बेपत्ता असलेले मंत्री आज समोर आले - चित्रा वाघ
काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मी राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. त्यांना संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले. आज संजय राठोड हे अवतरले आणि त्यांनी आज कोरोनाच्या नियमांचे देखील पालन न करता गर्दी जमवली आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, ही आमची मागणी असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही वाचा- धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल दरवाढीचे खापर फोडले जागतिक बाजारावर!