यवतमाळ - महाआघाडीचे आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, सरकारला कुठलाही धोका नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी थेट भाजपाला सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आहोत, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चव्हाण बोलत होते.
खासदार बाळू धानोरकरांची जीभ घसरली -
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी या मेळाव्यात भाषण केले. भाषणात भाजपावर टीका करताना त्यांची जिभ घरसरली. भाजपा आणि संघावर बोलताना त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहेत. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. भाजपाने आता हेडगेवार आणि सावरकर यांच्या नावावर मते मागून दाखवावीत. पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल चुकीची माहिती भाजपा पसरवत आहे. संघ हा देशद्रोही असल्याची भावना पटेल यांची होती. मात्र, भाजपा नेते काँग्रेसच्या नेत्यांना भाजप विचारसरणीचे असल्याचे दाखवत आहे, असे धानोरकर म्हणाले.
काँग्रेस हा स्वबळावर निवडून येणारा पक्ष -
आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सहा वेळा स्वबळावर आला आहे. तर, आघाडीसह चार वेळा सत्तेवर आला आहे. काँग्रेसने देशात संगणक आणले त्यावेळी भाजपाने त्या विरोधात आंदोलने केली. आज याच संगणकाच्या माध्यमातून भाजपा नागरिकांची दिशाभूल करत आहेत. युवकांमध्ये मतभेद निर्माण करत आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपाने तेखील जनतेला मोफत कोरोना लस देणार असे जाहीर केले. महाराष्ट्रातील जनता ही काय जनावरे आहेत का? असा प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थित केला.
कार्यकर्ता मेळाव्याला 'यांची' होती उपस्थिती -
हा कार्यकर्ता मेळावा वादाफळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.