यवतमाळ - जिल्हाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत वैद्यकीय राजपत्रित अधिकारी संघटनेने मागील तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांच्या या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून कोरोनाबाधितांच्या तपासणीला ब्रेक बसला आहे.
पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा या तीन ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि स्वॅब तपासणी सेंटर (डीसीएचसी) आहे. यवतमाळ येथे पजांबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाविद्यालय परिसरात दोन कोविड केअर सेंटर आणि जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात एक आणि 16 तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 22 ठिकाणी दररोज जवळपास हजार अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र, डॉक्टरांच्या आंदोलनामुळे तीन दिवसांपासून एकही तपासणी झाली नाही. नागरिक तपासणीसाठी येत असले तरी त्यांना परत जावे लागत आहे.
जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात 38 कोविड केअर सेंटर (सीसीसी) आहे. याच ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवल्या जाते. कर्मचारी नसल्याने रुग्णांचे नातेवाईक देखील भेट घेण्यासाठी येत असल्याचे चित्र बघायला मिळाले.