यवतमाळ - नेरच्या आजंती गावाजवळील एसटी बस आणि पेट्रोल टँकरमध्ये अपघात झाला आहे. यात एक जण ठार झाला असून 41 प्रवासी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये बहुतांश म्हणजे ३० शाळकरी विद्यार्थ्यांचा सामावेश आहे. सर्व विद्यार्थी वाढोना गावावरुन नेर येथे शाळेत जात असताना हा अपघात झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातामध्ये रामभाऊ पुणाजी जावळे (वय 75, मोरगाव, ता. बाळापूर, जि. अकोला) या कीर्तनकारांचा मृत्यू झाला. तर वाहन चालक बस चालक शेख अशपाक शेख अजीज (रा. खिडकीपुरा, ता. नेर) यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. या बसमधील 41 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले. यामध्ये बहुतांश 12 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा - बनावट फेसबुक खात्यावरून अश्लील फोटोसह कमेंट टाकून मागितली खंडणी, महिलेस मुंबईतून अटक