यवतमाळ - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या 'मरकझ' या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं कोरोनाबद्दल किती बेफिकिरी दाखवली जात आहे, हे समोर येत आहे. निजामुद्दीन येथील संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. या लोकांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
दिल्लीतून यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले 5 जण परत आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 7 जण अद्यापही जिल्ह्यात परतले नाहीत. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात वा राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबल्याची शक्यता आहे.
या 7 जणांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी सांगितले आहे. प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी दिल्लीहून परत आल्यानंतर बाहेर फिरताना आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सक्तीने गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या दिल्लीहून परतलेल्या 5 जणांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामधील 4 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून एकाला अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 93 आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.