यवतमाळ - दुचाकीवरून जात असताना अचानक रोही (नीलगाय) आडवी आल्याने झालेल्या अपघातात पाथ्रट येथील पती, पत्नीचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे अनाथ झालेल्या या कुटुंबातील मुलांना मदत करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला होता. वन मंत्री संजय राठोड यांनी या अपघातग्रस्त कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची सूचना केली होती. वन मंत्र्यांच्या सूचनेनुसार या या कुटुंबातील दोन मुले यश (12) व प्रणय (15) या बालकांच्या नावे 31 लाख 25 हजारांचा धनादेश जमा करण्यात आला आहे.
सहा ऑगस्टला झाला होता अपघात
दारव्हा तालुक्यातील पाथ्रटदेवी येथील निळूनाथ आमझरे (40), पत्नी निर्मला (35) आणि मुलगा यश (12) हे तिघे 6 ऑगस्टला दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान कळंब-राळेगाव मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर एक रोही अचानक आडवा आल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते. अपघातात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचे निधन झाले. तर मुलगा यश याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
31 लाखांची नुकसानभरपाई
वन विभागाच्या तरतुदीनुसार रोही या वन्यप्राण्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, मिळणाऱ्या मदतीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश वन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार अपघातात जखमी यश याच्या उपचारासाठी 1 लाख रुपये व मृत पती- पत्नी यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 15 लाख अशी 31 लाखांची मदत वनविभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान आमझरे दाम्पत्याची दोन्ही मुले अज्ञान असल्याने, शासनाच्या तरतुदीनुसार अर्थसहाय्याची ही रक्कम अज्ञान अपत्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर जमा करण्यात आली आहे.