यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील पाथरी येथील अनिल पेचे यांच्या शेतातल्या विहिरीत मागील ६ महिन्यापासून गव्हाळ्या जातीचे ३ कोब्रा नाग पडले आहेत. या सापांना आज २ सर्पमित्रांनी पकडून मारेगाव वनविभागामार्फत त्यांना सालेभटी येथील फेस्कीच्या जंगलात सोडून जीवदान दिले आहे. हरिष कापसे व योगेश केझळकर (वणी) असे या सर्पमित्रांचे नाव आहे.
पाथरी येथील अनिल पेचे या शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीमध्ये गेल्या ६ महिण्यापूर्वी ऐन होळीच्या दिवशी गव्हाळ्या जातीचे विषारी ३ कोब्रा नाग पडले होते. तेव्हापासून अनेकदा त्यांना विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न पेचे या शेतकऱ्याने केला. मात्र, ते अपयशी ठरले. दरम्यान, सर्पमित्र योगेश केझळकर व हरिष कापसे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांना विहिरीतील नाग काढण्यासाठी पाचारण करण्यात आले.
त्यानंतर या २ सर्पमित्रांनी तिन्ही विषारी नागांना कुठलीही इजा न करता मोठ्या शिताफीने विहिरीच्या बाहेर काढले. या नागांना वनविभागाचे क्षेत्र सहायक एन. के. आकुलवार यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आकुलवार यांनी तत्काळ या घटनेचा पंचनामा करुन सापांना सर्पमित्राच्या मदतीने सालेभटी येथील फेस्कीच्या जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले.
यावेळी वनविभागचे क्षेत्र सहायक एन. के. आकुलवारसह नगराळे, अरुण जाभुळकर, नीलेश गेडाम आदी वनकर्मचारी व वनमजूर उपस्थित होते.