यवतमाळ - दिल्ली येथून एका कंटेनरमध्ये अवैधरित्या आलेला प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. कळंब तालुक्यातील खुटाळाजवळ ही कारवाई करण्यात आली. एकूण 26 लाख 92 हजार 800 रुपये इतकी या पान मसाला आणि तंबाखूची किंमत आहे. याप्रकरणी, पद्मसिंह गजेंद्रसिंह तोमर, मोहनसिंग मुरारी (दोघेही रा. शिवपुरी, मध्यप्रदेश) या चालक आणि वाहकाला अटक करण्यात आली आहे.
नागपूरमार्गे एका कंटेनरमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि तंबाखू तस्करी होत असल्याची टीप अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना मिळाली. सदर कंटेनर कळंब ते नागपूर हायवेवरील खुटाळा गावानजीकच्या धाब्यावर थांबलेले असताना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने याठिकाणी छापा टाकला. कंटेनरची झडती घेतली असता यामध्ये राजनिवास पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आला. यानंतर ट्रकसह एकूण 51 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. या घटनेने तस्करांत खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, ठाणेदार विजय राठोड, पोलीस निरीक्षक भोयर, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, संदीप सूर्यवंशी यांच्यासह पथकाने केली.
हेही वाचा - गतिमंद महिलेवर बलात्कार करणारे नराधम जेरबंद