यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. ग्रामीण भागातून बाधित रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी रुग्णालयाच्या परिसरात फीवर ओपीडी उघडण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत ऑक्सिजन किंवा रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन अभावी रुग्णांची स्थिती खालावते. रुग्णांना चार ते पाच तास ताटकळत थांबावे लागते. याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने शिवसेनेचे माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड मित्र मंडळाकडून बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट देण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांचे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. तालुकास्तरावर शासकीय यंत्रणेजवळ ऑक्सिजन उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक गंभीर रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात. यामुळे जिल्हा रुग्णालयावर मोठा ताण येत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण ओळखण्यासाठी फिवर ओपीडी उघडण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे सुरुवातीला घरीच उपचार घेतात व गंभीर परिस्थितीत झाल्यावर रुग्णालयात येतात. शासकीय नियमाप्रमाणे लक्षणे जरी कोविडची असली तरी तपासणी व अहवाल येईपर्यंत कोविड वॉर्डात दाखल करता येत नाही. अशा वेळेस शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावल्याने रुग्णाची स्थिती अधिक गंभीर होते. त्यामुळे या ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार संजय राठोड यांच्याकडून 25 ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.