यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शनिवारी दिवसभरात 20 संभाव्य रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तर, आज(रविवार) सकाळी ७ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 41 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या 51 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १० रुग्णांना उपचारानंतर सुट्टी मिळाली आहे. मात्र एकाच दिवसात 20 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशाचनाच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान आधिच्या 20 रुग्णांपैकी 19 रुग्ण हे विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली होते. शनिवारी सकाळी यातील 1 रुग्ण, दुपारी 15 आणि सायंकाळी 4 असे एकूण 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी सापडलेले 20 रुग्ण पवारपुरा, इंदिरा नगर या पूर्णपणे शटडाऊन असलेल्या परिसरातील आहेत. तर, रविवारी सकाळी 7 नवे रुग्ण सापडल्यामुळे मागील 24 तासात सापडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 27 झाली आहे. एकूण 27 जणांमध्ये 14 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.
यवतमाळमध्ये आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 51 झाला आहे. त्यापैकी 10 जणांना डिस्चार्ज मिळाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 इतकी आहे. तर, 317 जणांचे नमूने तपासणीकरीता नागपुरला पाठविण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट अप्राप्त असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. काल नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे पूर्णपणे शटडाऊन करण्यात आलेल्या भोसारोड, मेमन कॉलनी, इंदिरानगर, गुलमोहर सोसायटी अशा 35 भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.