यवतमाळ - नेर येथील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. यामुळे शहरातील तेलीपुरा आणि आनंदवाडी हा भाग जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. या प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: प्रतिबंधित क्षेत्रात हजर होते.
नेर येथील तेलीपूरा आणि आनंदवाडी येथील दोन जणांचे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी एक जण गंभीर आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचे नमुने यवतमाळ येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल लॅब) त्वरित पाठवावे, अशा आदेश जिल्हाधिकाऱयांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
नेर येथील प्रतिबंधित क्षेत्रात जवळपास एक हजार घरे आहेत. येथील लोकसंख्या 5 हजार आहे. या सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सिमीटरने आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले. यासाठी आरोग्य विभागाच्या 90 चमू कार्यरत आहेत. आरोग्य पथकाद्वारे रोज सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पूर्ण शहरात 9 वॉर्ड आहेत. यासाठी पाच फिव्हर क्लिनिक स्थापन करण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टर्स आणि मेडीकल स्टोअर्सच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. एखाद्या खासगी डॉक्टर किंवा मेडीकलमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सतत आढळत आहेत. यासंदर्भातील सुचना त्वरीत तालुकास्तरीय समितीला द्यावी. नेरमध्ये मुंबई, पुणे किंवा राज्याच्या इतर रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची नोंद घेणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यात कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नेर शहराची लोकसंख्या 34 हजाराच्या जवळपास आहे. पुढील चार दिवसात म्हणजे रविवारपासून बुधवारपर्यंत तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 75 शिक्षक सर्वे करतील. तसेच थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्राकरीता 25 होमगार्ड 24 तास ड्यूटीकरीता उपलब्ध करून दिले आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियोजन करावे. तसेच तालुकास्तरीय समितीने अलर्ट मोडवर राहून काम करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.