यवतमाळ - दुबई येथून यवतमाळमध्ये परतलेल्या 'त्या' 9 नागरिकांपैकी दोन जणांचे थ्रोट नमुने तपासणीत पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एक महिला तर एक पुरुष असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी दिली आहे.
यवतमाळ येथील दुबईवरुन परतलेल्या 9 जणांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी त्यांच्या थ्रोट स्वॅबचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात आले होते यामध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
हेही वाचा -दुबईवरुन यवतमाळमध्ये आलेल्या 'त्या' 9 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये हलवले
जे नागरिक या प्रवाश्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:च घरात सेल्फ कॉरंटाईन करावे. हे नागरिक ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले त्यांची माहिती गोळा करण्याचे काम महसूल आणि आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. या लोकांपर्यंत पोहचून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कॉरंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी केले आहे.
हेही वाचा -पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत यवतमाळमधील दहा जणांचा दुबई ते मुंबई प्रवास