वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाचंबा ते एकलासपूर रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहिले. दरम्यान, पूल पार करून जाणारी 5 जनावरं या पुरात वाहून गेली.
2 जनावरं वाचली
एकलासपूर रस्त्यावरील पुलावरून पुराच्या पाण्यातून 5 जनावरं वाट काढत होती. पण, अचानक पाण्याचा जोर वाढला आणि एक एक करून पाचही जनावरं पाण्यात वाहून गेली. गावकऱ्यांनी 2 जनावरांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
पुरामुळं पाचंबा-एकलासपूर गावांचा संपर्क तुटला
वाशिम जिल्ह्यात पावसाने सलग दोन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात ढगफुटी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आला आहे. तसेच या पुरामुळं पाचंबा-एकलासपूर गावांचा संपर्क तुटला आहे.
पिकांचे नुकसान
जिल्ह्यात सतत दोन दिवस पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. यामुळे सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपातील इतरही शेकडो एकरांवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरते बेजार झाले आहेत. पुन्हा एकवेळ नुकसानीचे पंचनामे होण्याची प्रतीक्षा आणि शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईची आस शेतकऱ्यांना लागली आहे.
हेही वाचा - क्रीडा विश्वावर शोककळा! महाराष्ट्राच्या धावपटूचा हरियाणात स्पर्धेदरम्यान मृत्यू